अभिप्राय / तक्रार फॉर्म

ठळक बातम्या

पोलीस शिपाई भरती २०२२-२३, माहिती डाइल ११२ सिटीझन पोर्टल एन.आई.सी. ईमेल - Kavach Authentication बाबत मार्गदर्शन देशाच्या सेवेत भारतीय पोलीस

महाराष्ट्र राज्य पोलीस

अधिकृत संकेतस्थळ

ठळक बातम्या

पोलीस शिपाई भरती २०२२-२३, माहिती डाइल ११२ सिटीझन पोर्टल एन.आई.सी. ईमेल - Kavach Authentication बाबत मार्गदर्शन देशाच्या सेवेत भारतीय पोलीस

महाराष्ट्र पोलीस मुख्यालय

महाराष्ट्र पोलिस मुख्यालय सध्याच्या हेरिटेज बिल्डिंगमध्ये १९८२ साली हलवण्यात आले. त्यावेळी राज्य पोलिसदलातील मनुष्यबळाची संख्या ८७००० एवढी होती आणि पोलिस महानिरीक्षकांच्या हुद्दयाचे अधिकारी पोलीसदलाचे नेतृत्व करत होते. आज मनुष्यबळाची संख्या २,००,०००हून अधिक आहे आणि त्याचे नेतृत्व पोलिस महासंचालकांकडे आहे. 

सध्याच्या हेरिटेज इमारतीला दीर्घ इतिहास आहे. या इमारतीचे बांधकाम रॉयल आल्फ्रेड सेलर्स होम म्हणून फेब्रुवारी १८७२ मध्ये सुरू झाले आणि १८७६ मध्ये ते पूर्ण झाले. यासाठी ३,६६,६२९ रुपये (अंदाजित रकमेहून २००० रुपये कमी) खर्च आला होता. बडोदा संस्थानाचे महामहीम महाराज खंडेराव गायकवाड यांनी या मानाच्या इमारतीसाठी २,००,००० रुपये देणगी दिली होती. 

ड्युक ऑफ एडिनबर्ग यांच्या १८७० मधील भारतभेटीची आठवण म्हणून ही इमारत बांधण्याची कल्पना आली. इमारतीचा पाया ड्युक एडिनबर्ग यांनी त्यांच्या भेटीदरम्यान हॉर्नबाय रॉच्या खालील भागात घातला. अर्थात हे स्थळ नंतर बदलण्यात आले आणि ड्युक यांनी ठेवलेली कोनशिला उचलून नवीन स्थळी ठेवण्यात आली. इमारतीचे बांधकाम १८ फेब्रुवारी, १८७२ रोजी सुरू झाले. 

या २७० फूट लांब आणि ५८ फूट रुंद इमारतीची रचना आर्किटेक्ट स्टीव्हन्स यांनी केली होती. इमारतीच्या दर्शनी भागात अत्यंत कल्पकतेने निळ्या बेसॉल्ट दगडाचा वापर करण्यात आला आणि तपशिलांमध्ये विविध नैसर्गिक रंगांचे दगड वापरण्यात आले. यामुळे एक अविश्वसनीय असा विविधरंगी (पोलिक्रोमॅटिक) प्रभाव साधला गेला. स्टीव्हन्स यांनी रचना केलेल्या अनेक इमारतींमध्ये नंतर ही कल्पना वापरण्यात आली. 

इमारतीचे विभाजन दोन विंग्जमध्ये करण्यात आले होते. उत्तरेकडील विंग ११० फूट बाय ५८ फूट होती. दक्षिणेकडील विंगची रचना मुळात अधीक्षकांचे निवासस्थान म्हणून करण्यात आली होती. अधिकारी व खलाशांसाठी भोजनगृहे नॉर्थ विंगच्या तळमजल्यावर होती, तर मध्यभागी विशाल प्रवेशदालन होते. याच्या पॅनल्सवर सागवानी लाकडाचे काम होते. निळ्या बेसॉल्ट दगडात तयार केलेल्या जिन्यांचे रक्षण करण्यासाठी कमानींवर नेटकेपणाने लोखंडी कठडे चढवण्यात आले होते.  दक्षिणेकडील तळजमजल्याच्या अर्ध्या भागात एक मोठे वाचनालय, अधीक्षकांचे कार्यालय आणि स्टोअररूम्स होत्या. पहिल्या मजल्यावरील उत्तरेकडील सर्व भाग अधिकाऱ्यांच्या डॉर्मिटरीसाठी राखून ठेवलेला होता. या भागातील उर्वरित जागा आणि, इमारतीच्या अगदी दक्षिणेकडील छोट्या भागाचा अपवाद वगळता, दुसरा मजला खलाशी वापरत होते. मागील अंगणात सेवकांची क्वार्टर्स होती आणि फाइन बोलिंग व स्किटल गल्ली होती. 

ही इमारत २० अधिकारी व १०० खलाशांना पुरेशी होईल अशी बांधण्यात आली होती आणि गरज भासल्यास अतिरिक्त निवासाची तरतूदही ठेवण्यात आली होती. इमारतीच्या दर्शनी भागातील वरील टोकाच्या त्रिकोणामध्ये नेपच्युनचे शिल्प विराजमान होते, तर छतावर लाल मंगळुरी फरशा होत्या. ही शिल्पे जेजे स्कूल ऑफ आर्टमधील विद्यार्थ्यांनी जॉन लॉकवूड किप्लिंग (प्रख्यात लेखक रुदयार्ड किप्लिंग यांचे वडील) यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती. जॉन किप्लिंग यांची १८६५  साली जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये आर्किटेक्चरल स्कल्पचर्सचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली होती. 

इमारतीचे संपूर्ण काम फेब्रुवारी ते नोव्हेंबर १८७२ या काळात जेएचई हार्ट, माइस यांच्या, तर नोव्हेंबर १८७२ ते फेब्रुवारी १८७६ या काळात कर्नल जे. ए. फ्लुलर, आरई यांच्या पर्यवेक्षणाखाली पार पडले. एफ. डब्ल्यू. स्टीव्हन्स हे कार्यकारी इंजिनीअर होते, सीताराम खंडेराव वैद्य यांनी ओव्हरसीयर म्हणून काम बघितले. 

ही इमारत सरकारने १९२८ मध्ये, कमिटी ऑफ द रॉयल आल्फ्रेड सेलर्स होमकडून मुंबई विधानपरिषद म्हणून उपयोगात आणण्यासाठी, स्वत:कडे घेतली. १९३०च्या दशकाच्या अखेरीस सेलर्स होम ही विधानपरिषदेची इमारत झाली. सुमारे १४८ सदस्यांना सामावून घेऊ शकेल असा कौन्सिल हॉल इमारतीच्या पाठीमागे बांधण्यात आला आणि मुख्य इमारतीला एका पॅसेजद्वारे जोडण्यात आला. सरकारचे सल्लागार आर्किटेक्ट जे. मेर्सर यांनी रचना केलेल्या कौन्सिल हॉलच्या भिंती या पिवळ्या बेसॉल्टमध्ये आणि दगडात बांधण्यात आल्या होत्या, तर लोखंडी सळ्यांवर काँक्रिटची बांधणी करून छत तयार करण्यात आले होते.  या इमारतीमधील एक अनन्यसाधारण वैशिष्ट्य म्हणजे मुख्य दालनातील, रबर एस्बेस्टोसमध्ये तयार करण्यात आलेल्या फरशा होय. वातानुकूलन (एसी) प्लाण्टने सुसज्ज अशी कौन्सिल हॉल ही कदाचित मुंबईतील पहिली इमारत असावी. त्यानंतर अनेक वर्षे मुख्य इमारतीचा वापर विधानसभेची इमारत म्हणून करण्यात आला. १९८२ मध्ये नवीन कौन्सिल हॉल बांधेपर्यंत विधानसभा याच इमारतीत होती. 

आज या इमारतीमध्ये पोलीस महासंचालकांचे कार्यालय आहे. राज्य पोलीस खात्यातील धोरणनिश्चिती, नियोजन आणि अमलबजावणी यांबाबतची सूत्रे याच इमारतीतून हलतात. या इमारतीत पोलीस मुख्यालय आले तेव्हा श्री. के. पी. मेढेकर पोलीस महासंचालक होते. तेव्हापासून या इमारतीने २४ पोलीस महासंचालक बघितले आहेत.